अंबाजोगाईचा विकास : आश्वासनांच्या भूलथापांमध्ये अडकलेले शहर, वाचा…

टीम AM : मराठवाडा ‌मुक्तिसंग्रामातील महत्वाचे शहर आणि मराठवाड्याची‌ सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं अंबाजोगाई शहर गेल्या कित्येक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. मराठवाड्यातील काही शहरांनी आपल्या मागण्या ‌पदरात पाडून घेऊन झपाट्याने पुढे गेली. परंतू, अंबाजोगाई ‌मात्र आजही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिले आहे. अंबाजोगाईत केवळ ‘रस्ते व नाली म्हणजे विकास नव्हे’, गेल्या कित्येक निवडणुकीच्या प्रचारात अंबाजोगाई जिल्हा, बुट्टेनाथ साठवण तलाव, ‘एमआयडीसी’, ‘टेक्सटाईल पार्क’ यांसारख्या मोठ्या योजनांची घोषणा झाली होती. मात्र, आजही या योजना केवळ कागदावरचं आहेत. परिणामी अंबाजोगाईचा विकास ‘जैसे थे’ अवस्थेतच राहिला आहे.

विकासाचे प्रश्न कायम दुर्लक्षित

केज विधानसभा निवडणूक असो की, नगरपरिषद निवडणूकीत दिलेल्या घोषणांमुळे अंबाजोगाईकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नाही. शहरातील रोजगारनिर्मिती, पाणीटंचाईवरील कायमस्वरूपी उपाय, औद्योगिक विकास, शिक्षण व आरोग्य सुविधा या मूळ प्रश्नांकडे कायम दुर्लक्षच झाले आहे. ‘एमआयडीसी’ ‘टेक्सटाईल’ पार्कच्या नावावर युवकांना रोजगाराचे गाजर दाखवले गेले होते. पण आजपर्यंत एकही विट रोवली गेली नाही. त्याचप्रमाणे बुट्टेनाथ साठवण तलाव योजना लोकांसाठी स्वप्नवतच ठरली आहे.

फक्त रस्ते आणि नाली…!

अंबाजोगाई शहरात रस्त्याचं आणि नाल्यांचं बांधकाम हेच विकासाचे मापदंड समजले जात आहेत. पण ही कामे ही केवळ तात्पुरती सोय असून त्याला खऱ्या विकासाशी जोडता येत नाही. ‘रस्ते नाली पुरे झाले, आता आम्हाला नोकऱ्या, उद्योग आणि शाश्वत पाणी हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया अंबाजोगाईकर व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावरून रोष व्यक्त

अंबाजोगाईकर सोशल मिडीयावरुन लोकप्रतिनिधींना वारंवार प्रश्न विचारत आहेत, निवडणुकीत दिलेली‌ आश्वासने कुठे गेली ? अंबाजोगाई जिल्हा केव्हा होणार ? उद्योग केंव्हा येणार ? अंबाजोगाई शहराचा खरा विकास केंव्हा होणार ? हा आवाज आता केवळ काही व्यक्तींचा नसून शहरातील बहुसंख्य नागरिकांचा झालेला आहे.

स्वप्न दाखवून फसवली जाते

अंबाजोगाईचा विकास हा राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यापुरता मर्यादित राहिला आहे. जनता दरवेळी निवडणुकीच्या आधी स्वप्न दाखवून फसवली जाते. शहराचा विकास रस्ते आणि नाल्यांपुरता मर्यादित ठेवून लोकप्रतिनिधींकडून आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होतो. पण खरा विकास म्हणजे रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पाणी यांची शाश्वत व्यवस्था. अंबाजोगाईकरांना केवळ आश्वासनं देऊन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी ‌हवीय.