माजी आमदार संजय दौंड यांनीही साजरा केला बैलपोळ्याचा सण
टीम AM : श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा आज अंबाजोगाईत आणि परिसरातील गावांत मोठ्या उत्साहात व पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना नदी – नाल्यांवर नेऊन स्नान घातले. उटणे, तेल, तूप लावून त्यांची निगा राखण्यात आली. त्यानंतर फुलांचे हार, गोंदण, रंगीत कापडं, चांदीच्या गोंडे व रंगीबेरंगी सजावटींनी बैलांना अलंकारिक रूप देण्यात आले.
गावागावांत बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल – ताशा, लेझीम, टाळ – झांज यांच्या गजरात शेतकरी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वातावरण दणाणून सोडले. महिला मंडळींनीही पारंपरिक पोशाख नेसून पूजा – अर्चा केली तर लहान मुलांनी फुलांनी सजवलेले छोटे बैल खेळण्यात आणून उत्सवात रंग भरले.
या निमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, खेळ आयोजित करण्यात आले. शेतकरी बांधवांनी बैलांना पुरणपोळी, हरभरा, पुऱ्या यांचा नैवेद्य दाखवून त्यांचे पूजन केले. गावोगावी सामाजिक एकत्रतेचे दर्शन घडले.
शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने शेतकरी बांधव विशेष आनंदी दिसत होते. ‘बैल हे आमचे लेकरं आहेत, त्यांच्याशिवाय शेतातील कामाची कल्पनाच करता येत नाही’, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर उत्साहाचे वातावरण राहिले. पारंपरिक गाणी, नृत्य, आणि बैलांच्या सजावटीमुळे प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौकात सणाचा माहोल अनुभवायला मिळाला.
माजी आमदार संजय दौंड यांनीही साजरा केला बैलपोळ्याचा सण
माजी आमदार संजय दौंड यांनीही शेतकऱ्यांबरोबर बैलपोळ्याचा सण साजरा करून ग्रामीण संस्कृतीशी एकरूप झाले. दौंड यांनी सकाळी त्यांच्या शेतात आई – वडिलांसोबत बैलांचे पूजन करून त्यांना फुलहार अर्पण केले, गोडधोडाचा नैवेद्य दाखवला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत त्यांनी बैलपोळ्याचा शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दौंड कुटुंबीय उपस्थित होते.



