अभिनेता विजय थलापतीची आगामी निवडणुकीसाठी मोठी घोषणा‌ : जनतेच्या शक्तीवर उभा राहिलेला आमचा पक्ष, वाचा…

टीम AM : तामिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय थलापती यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. 2026 च्या निवडणुकीसाठी विजय थलापती यांच्या नेतृत्वातील तमिलगा वेट्ट्ररी कझगम (टीव्हीके) पक्ष राज्याच्या राजकारणात पदार्पण करणार आहे. मदुराईत पार पडलेल्या टीव्हीकेच्या दुसऱ्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते.

विजय थलापती यांनी स्पष्टच सांगितले की, ‘टीव्हीके पक्ष सत्ताधारी द्रमुक किंवा भाजपसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युती करणार नाही. आम्ही भ्रष्टाचार करणारे नाही. जनतेच्या शक्तीवर उभा राहिलेला आमचा पक्ष आहे.’

विजय थलापती म्हणाले, ‘सिंह फक्त शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. भुकेला असला तरी सडलेले मांस खात नाही. त्याला एकट्याने किंवा गटाने कसे यायचे ते माहित असते. सिंह मात्र स्वतःची सीमारेषा निश्चित करतो. त्याचप्रमाणे आमचा पक्षही स्वतःचा मार्ग निवडतो. मदुराईच्या भूमीवर आलो की माझे भाऊ कॅप्टन विजयकांत आठवतात. 1967 आणि 1977 या दोन वेळा तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडला. तसेच 2026 मध्येही त्याचीच नांदी असणार आहे.’

भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत विजय स्पष्ट म्हणाले, ‘आमचा एकमेव शत्रू भाजप आहे, तो वैचारिक प्रतिस्पर्धी आहे आणि तामिळनाडूमध्ये द्रमुक राजकीय प्रतिस्पर्धी आहे. पाशवी भाजपसोबत थेट किंवा अप्रत्यक्ष युती करणे आम्हाला मान्य नाही’.