टीम AM : राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी अपात्र असलेल्या अनेकांनी या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. यात अनेक सरकारी तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.
अशावर कारवाई करण्यासाठी सरकार पाऊल उचलणार आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. ही नावे ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवली आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या यादीत जिल्हा परिषदेच्या 1 हजार 183 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असून परिषदेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी हे संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आणि बालविकास विभागाला उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 18 ऑगस्ट रोजी पाठवलेल्या पत्रात केली आहे.



