रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (खरात गट) आंदोलनाला यश : गुत्तेदारांकडून होणार 13 लाखांची वसुली, वाचा…

जीवन गायकवाड यांचे 7 दिवस आमरण उपोषण : रास्ता रोको आंदोलन

टीम‌ AM : एनएच – 548 डी हा लोखंडी सावरगाव ते सनगाव ग्रामीण रस्ता क्रमांक – 119 विना परवाना रस्ता खोदून जिल्हा परिषद विभागाचे लाखो रूपयांचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व संबंधित गुत्तेदारांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी अंबाजोगाईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड यांनी 12 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते. सतत 7 दिवस उपोषण करून प्रकृती खालावल्याने गायकवाड यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, तरी ही या आंदोलनाचे रूपांतर रास्ता रोको मध्ये झाले. 

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व मागणीचे स्वरूप लक्षात घेऊन उपअभियंता राजेंद्र काळे (जि.प.बांधकाम उपविभाग, अंबाजोगाई) यांनी संबंधित गुत्तेदार होळंबे यांच्याकडून सदरील रस्त्याच्या संपूर्ण नुकसानीची भरपाई करून घेणेबाबत लेखी सुचना दिली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांच्या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी दिली आहे.

या आंदोलनात महिला अध्यक्षा मिना लोंढे, मराठवाडा प्रवक्ते धीमंत राष्ट्रपाल, नितीन गोदाम, महिला तालुकाध्यक्षा रेखा मस्के, गणेश उपाडे, तालुकाध्यक्ष बादल तरकसे, अनिल सावंत, शेरू पठाण, शंकर उजगरे, रवि आवाडे, पंचशिल राऊत, संगिता चाटे, मुस्तकीम शेख, शोबाज पठाण, अमन कोकाटे, अमित कोकाटे, विशाल बनसोडे आदींसह‌ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.