‘सद्दाम, यू आर ग्रेट’ ! बिकट परिस्थितीशी झुंज देत ‘एमबीबीएस’ पर्यंतचा प्रवास : अंबाजोगाईच्या सद्दाम सलीम शेखची यशोगाथा

टीम AM : ‘शपत… या लेकराच्या संकटांना मोजायला शब्दच नाहीत’, असं म्हणावं लागेल अशी प्रेरणादायी कहाणी अंबाजोगाईत घडली आहे. वडिलांचा खून, घरात एकही पुस्तक नाही, शिकवणी नाही, नीट शिकवणारे मोजकेच शिक्षक… तरीही केवळ चिकाटी, प्रामाणिक मेहनत आणि आईचं अमोल पाठबळ याच्या जोरावर एका विद्यार्थ्यानं स्वप्नवत यश मिळवलं आहे.

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई येथे इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या सद्दाम सलीम शेख या विद्यार्थ्याने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे ‘एमबीबीएस’ प्रवेश मिळवला आहे.

विटभट्टीवर केले काम

सद्दामची 10 वीमध्ये असतानाच घरातील बिकट परिस्थिती शिगेला पोहोचली. वडिलांच्या खुनानंतर आईवर सर्व जबाबदारी आली. घरात शिकवणी तर सोडाच, एकही पुस्तक नव्हतं. परिस्थितीमुळे दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे बंद करून आईसोबत विटभट्टीवर मुक्कामी राहून त्याला काम करावं लागलं. शिक्षणाचा धागा तुटू नये म्हणून काही शिक्षकांनी पुढाकार घेत त्याला बोलावलं, परत फॉर्म भरून दिला, स्वतःच्या खर्चाने पुस्तकं उपलब्ध करून दिली.

मोबाईलवरून घेतले शिक्षण

पुस्तकांची टंचाई आणि शिकवणीचा अभाव यामुळे मोबाईलवरूनचं सद्दामचा अभ्यास सुरू राहिला. खाण्यापिण्याच्या समस्याही रोजच्याच होत्या. अभ्यासात फारसे मदत करू शकतील असे मित्र नव्हते. मात्र, सद्दामची शिकण्याची जिद्द आणि आईचं अपार धैर्य हेच त्याचे बळ ठरले.

अडथळ्यांवर केली मात

या साऱ्या अडथळ्यांवर मात करून सद्दामने वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक पात्रता मिळवली. अंबाजोगाईचं नाव उजळवत त्याने ‘एमबीबीएस’ च्या प्रवेशासाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. या यशानंतर अंबाजोगाईत, शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याचं कौतुक होत आहे. ‘सद्दाम, यू आर ग्रेट !’, अशा शब्दांत त्याचं सर्वत्र अभिनंदन होत असून ,त्याची ही संघर्षमय कहाणी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.