अंबाजोगाईत ‘डिजे मुक्त’ गणेशोत्सवाचा ऐतिहासिक निर्णय, वाचा…!

टीम AM :  अंबाजोगाई शहरात यंदाचा गणेशोत्सव डिजेच्या कर्णकर्कश आवाजाविना, पारंपरिक आणि सांस्कृतिक ढोल – ताशांच्या गजरात साजरा होणार आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

या बैठकीस अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, विविध विभागांचे अधिकारी, तसेच सर्व प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेत ध्वनीप्रदूषणामुळे होणारे आरोग्य व कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अधोरेखित करण्यात आले. अखेर शहराचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शांतता समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, मिरवणुकीत केवळ ढोल – ताशांचा गजर, लेझीम अशा पारंपरिक कलांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे. हा निर्णय ऐकून अंबाजोगाईतील अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, यंदाचा गणेशोत्सव श्रद्धा, संस्कृती आणि शांततेचा संगम ठरणार आहे.