टीम AM : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर पत्ते आणून टाकल्याचा प्रकार घडला. या घनटेनंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आता याच मारहाणीच्या प्रकरणावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारची मारहाण करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे देखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत. यावरच तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मारहाणीत सूरज चव्हाण असतील तर ते चूक आहे. मी याचं कधीच समर्थन करणार नाही, असे तटकरे म्हणाले. तसेच मी शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न सुटत असतात. छावा संघटनेचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आले होते. मी त्यांची भावना शांततेने ऐकून घेतली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.