टीम AM : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली असून, त्यासाठी त्याला तातडीने अमेरिकेला रवाना करण्यात आलं आहे. या अपघातामुळे सिनेमाच्या शूटिंगलाही विलंब होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शाहरुख खान हा ‘किंग’ सिनेमात आपल्या मुली सुहाना खानसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार होता. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना त्याला ही दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला किमान एक महिन्याची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानच्या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी मसल्सना इजा झाली आहे. या दुखापतीची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे, मात्र, त्याच्या दुखण्यामुळे अमेरिका येथे तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर ‘किंग’ सिनेमाचं जुलै – ऑगस्टमधील शूटिंग शेड्यूल रद्द करण्यात आलं असून आता शूटिंग सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. शाहरुख पूर्णपणे बरा होईपर्यंत शूटिंग सुरू केलं जाणार नाही, असं चित्रपट युनिटमधून सांगण्यात येत आहे.