अंबाजोगाईत 1014 गरजूंचा तपासणी शिबीरात सहभाग
टीम AM : केंद्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना आवश्यक तो लाभ मिळावा, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सर्व दिव्यांगाना अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन खा. बजरंग सोनवणे यांनी दिले. जिल्हा समाज कल्याण विभाग बीड व ‘अलिम्को’ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना व जेष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य साधने वाटप करण्याच्या अनुषंगाने दि.19 जुलै रोजी पंचायत समिती येथे पूर्व तपासणी शिबीर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिबीरात 1014 जणांची तपासणी करण्यात आली.
यावेळी माजी आ. पृथ्वीराज साठे, राजसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, माधव जाधव, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, दिपक शिंदे, संजय भोसले, पिंटू ठोंबरे, अमोल चव्हाण, शरीफ सय्यद, शितल लांडगे, गटविकास अधिकारी दिवाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे यांच्यासह ‘अलिम्को’ संस्थेची संपूर्ण टीम उपस्थिती होती.
शिबीरांमध्ये दिव्यांगांना जयपुरी फुट, कृत्रिम हात, कॅलीपर, व्हिलचेअर, ट्रायसिकल, क्रचेस, वॉकींग स्टीक, ब्रेल किट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र यासह जेष्ठ नागरिकांकरिता बेल्ट, वॉकर, काठया, चष्मे, कृत्रिम दात, खुबड, कृत्रिम अवयव, कानाची मशिन, व्हिलचेअर कमोडसहीत, सिलीकॉन खोम तकीया, नीब्रेस, स्पायनल सपोर्ट, सरवायकल कॉलर यासह इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुर्व तपासणी शिबीर त्या – त्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये आयोजित करण्यात येत असून दि.19 जुलै रोजी अंबाजोगाई येथे शिबीराचे उद्घाटन खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले.
आवश्यक कागदपत्रे
दिव्यांग : दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, वार्षीक उत्पन्नाचा दाखला/ रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे मासिक 22500 किंवा वार्षीक 270000 च्या आत व जेष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, वार्षीक उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे (मासिक 15000 किवा वार्षीक 180000 च्या आत असावे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एस. एन.मेश्राम यांनी दिली आहे.