‘वो सात दिन’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला 43 वर्ष पूर्ण, वाचा…

टीम ‌AM : सुरींदर कपूर निर्मित आणि बापू दिग्दर्शित ‘वो सात दिन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज 43 वर्षे पूर्ण झाली. प्रदर्शनाची तारीख. 23 जून 1983. खरं तर या चित्रपटाचे मूळ कथानक ‘Andha 7 Naatkal’ या तमिळ चित्रपटाचे. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन के. भाग्यराज याचे. त्यावरुन बापू यांनी तेलगू चित्रपट निर्माण केला आणि या चित्रपटाला उत्तम यश लाभल्याने त्याची हिंदीत रिमेक करण्यात आली. 

लग्न झाल्यावर डॉ. आनंद (नसिरुद्दीन शहा) यांच्या लक्षात येते की, आपल्या पत्नीचे मायाचे (पद्मिनी कोल्हापूरे) तिच्या मनाविरुद्ध आपल्याशी लग्न केले गेले असून तिचे प्रेम प्रेम प्रतापसिंग पटीयालवाला (अनिल कपूर) यांच्याशी आहे. आपण मायाचे लग्न प्रेम याच्याशी करुन द्यायला हवे….. ही या चित्रपटाची गोष्ट आहे.

कालांतराने याच थीमवर संजय लीला भन्सालीने ‘हम दिल दे चुके सनम’ साकारला. त्याचा कॅनव्हास भव्य केला. ‘वो सात दिन ‘चे एक वैशिष्ट्य म्हणजे, संकलन एन. चंद्रा यांचे आहे. या चित्रपटाच्या गुणवत्तेत त्यांचाही वाटा आहे. या चित्रपटात नसिरुद्दीन शहा, अनिल कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच आशालता बावगावकर, निळू फुले यांच्यासह राजू श्रेष्ठ, दीना पाठक, जगदीप, सतिश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आनंद बक्षी यांच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. प्यार किया नही जाता हो जाता है, अनारी खेलना खेल का सत्यानाश, पायलिया इत्यादी गाण्यांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटाचे लेखन जैनेन्द्र जैन यांचे आहे.

संकलन : संजीव वेलणकर