टीम AM : दुष्काळी बीड जिल्ह्याला पाणीदार बनवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 17 सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही तीन वर्षांत प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने या प्रकल्पाची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करून दुष्काळाच्या अतोनात झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या रद्द केलेल्या प्रकल्पांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावातील गाव तलावाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये गाव तलाव, पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे यांचा यात समावेश होता. जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्प रद्द करण्यासाठी दोन बैठका झाल्या.या सिंचन प्रकल्पासाठी 5 कोटी 33 लाखांचा निधी देण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 903 प्रकल्प हे रद्द केले खरे परंतू, यात बीड जिल्ह्यातील 17 प्रकल्पांचा समावेश असून एकीकडे मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्त करण्याच्या केलेल्या घोषणा ह्या यामुळे केवळ पोकळ घोषणाचं ठरल्या आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेतात ? याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.