गुड न्यूज : ‘स्वाराती’ त रेडियोलॉजीच्या पदव्यूत्तर 4 जागांना ‌मान्यता

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रेडियोलॉजी विभागात पदव्यूत्तर 4 जागांना मान्यता मिळाली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी दिली आहे. पदव्यूत्तरच्या 4 जागांना मान्यता मिळाल्याने रेडियोलॉजी विभागाला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. याचा फायदा रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना होणार आहे.

गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयातील रेडियोलॉजी विभाग गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडला होता. या ठिकाणी असणाऱ्या पदव्यूत्तर जागा ‘एमआरआय’ आणि इतर सुविधा नसल्याने लॅप्स केल्या होत्या. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत होता. रेडियोलॉजी विभाग पुन्हा सुरु करण्यासाठी ‘स्वाराती’ प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत होते. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुडे यांनी ‘स्वाराती’ प्रशासनाला ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे लवकरचं ‘स्वाराती’ चा रेडियोलॉजी विभाग पुन्हा सुरु होईल, अशी आशा सर्वांनाच वाटत होती. ‘स्वाराती’ प्रशासनाने ही ‘एमसीआय’ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार विभागातील विभागप्रमुखाचे पद आणि इतर त्रुटी सातत्याने प्रयत्न करुन दूर केल्या. ‘एमआरआय’, ‘सिटी स्कॅन’, सोनोग्राफी यासह अन्य सुविधा विभागात कार्यान्वित असल्याने अखेर रेडियोलॉजी विभागात पदव्यूत्तरच्या 4 जागांना मान्यता मिळाली आहे. 

रुग्णांना होणार फायदा

‘स्वाराती’ रुग्णालयातील रेडियोलॉजी विभागात पदव्यूत्तरच्या 4 जागांना मान्यता मिळाल्याने याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होणार आहे. विभागातील ‘एमआरआय’, ‘सिटी स्कॅन’, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स रुग्णांना तात्काळ मिळतील आणि यासाठी खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज रुग्णांना पडणार नाही. पदव्यूत्तरच्या जागांमुळे ‘स्वाराती’ चा रेडियोलॉजी विभाग अधिक सक्षम होणार आहे.