सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : गुन्हा दाखल, वाचा… 

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. 

अंबाजोगाई व धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती. माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शुभांगी शिंदेंच्या मृतदेहाचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पार्थिवावर गिता येथे काल (गुरूवारी) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पतीसह सासू – सासरे आणि नणंद यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचं म्हटलं आहे.