पावसाची विश्रांती : पेरणीची घाई करू नये, वाचा…

टीम AM : सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला राज्याच्या कृषी विभागानं पुन्हा एकदा दिला आहे. 

तर, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात 8 पूर्णांक 3 मिलिमीटर तर विभागात 8 पूर्णांक 9 मिलिमिटीर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात साधारण 3 जूननंतर मान्सूनचा पहिला टप्पा किंवा स्पेल संपेल. त्यानंतरच म्हणजे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे.