योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन
टीम AM : योगेश्वरी देवल कमिटीचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु असून हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल आहे. अगदी काही दिवसापुर्वी उच्च न्यायलयाने एक निकाल दिला. त्या निकालाचा अर्थ दोन्ही पार्ट्यानीं आपपल्या परीने काढला आणि आमच्याच बाजूने निकाल दिला, असे सांगितले. तशा आशयाच्या पोस्ट देखील समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्या. परंतू आज योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्रा. अशोक लोमटे यांनी योगेश्वरी देवल कमिटीच्या कारभारासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे सांगत देवल कमिटीचा कारभार आम्हीच पहाणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो व त्या आदेशाचा मान राखतो. सदरील आदेशात 2024 ला आलेल्या नविन कमिटी बाबत कोणतीही टीकाटिपणी केलेली नाही. उलट 2016 ची ज्या मागील कमिटीने घटना बनवली ती घटना रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे 2016 ला असलेल्या कमिटीवर त्याचा रोष जातो. सदरील 2016 ची घटना ज्यांनी सादर केली, त्या घटनेत पुजाऱ्यांचे हक्क डावलले गेलेले आहेत. पुजारी पण 2016 च्या घटनेविरोधात कोर्टात गेलेले होते. त्यांच्या हक्कासंबंधी विचार व्हावा, असे कोर्टाने आदेशित केलेले आहे. आम्ही सनदशीर मार्गाने मंदिराचा कार्यभार करत आहोत. याबाबत अनेक भक्तांनी आपले मत नोंदवलेले आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून चालत असलेल्या कमिटीनेच 2023 पर्यंत कामकाज केलेले होते. त्यांनीच 2016 ची पण घटना केलेली होती. त्या घटनेवरच कोर्टाने आक्षेप घेऊन सदरील घटना रद्द केलेली आहे. 2016 साली पुजाऱ्यांचे कायद्याने असलेले हक्क पुजाऱ्यांना द्यायला पाहिजे होते. पण ते 2016 साली डावलले गेले होते. त्यामुळे 2024 च्या कमिटीवर न्यायालयाचा किंवा पुजाऱ्यांचा कोणताही आक्षेप नाही, असं प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार पृथ्वीराज साठे, सचिव प्रा. अशोक लोमटे, सहसचिव संजय भोसले, राजपाल भोसले, अमोल लोमटे, सतिश लोमटे यांच्यासह आदी सदस्यांची उपस्थिती होती.