टीम AM : अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘महावितरण’ ने यंत्रणेसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच ‘महावितरण’ चे मुख्यालय व राज्यातील अन्य ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.
आपत्कालीन नियोजनानुसार प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, वीजतारांसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी, दुरुस्तीसाठी अभियंते, कर्मचारी, तसेच सर्व एजन्सींनी मनुष्यबळ, वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहावे, असे आदेश ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांबाबत लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी आढावा घेतला.