मागासवर्गीय लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : जनतेतून तीव्र नाराजी
टीम AM : मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी करोडो रुपायांची तरतूद करते. पण हा निधी त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी वापरला जातोच असा नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजूनही मागासवर्गीयांच्या वस्त्या ओसाड पडलेल्या दिसून येतात. अंबाजोगाई शहरात तर परिस्थिती अजूनही बिकट आहे. शहरातील वस्त्यात रस्ते, नाली, पाणी पुरवठा याच्या तर समस्या आहेतच पण मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींची देखील दुरवस्था झालेली आहे. नगरपरिषद प्रशासनाने आणि अंबाजोगाई तालुका प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मागासवर्गीय जनतेतून करण्यात येत आहे.
अंबाजोगाई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढत जरी असली तरी शहरात अजुनही नागरिकांना मुलभूत समस्यांसाठी झगडावे लागत आहे. शहराच्या विकासाचे कुठलेही व्हिजन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून आहे त्या परिस्थितीत अंबाजोगाईकरांना रहावे लागत आहे. त्यातल्या त्यात मागासवर्गीयांच्या समस्या तर कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.
मागासवर्गीयांच्या प्रत्येक वस्त्यांत स्मशानभूमीची उभारणी करण्यात आली आहे. या स्मशानभूमींची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून ‘जैसे थे’ अशीच आहे. स्मशानभूमी परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य असून काटेरी बाभळींच्या विळख्यात या स्मशानभूमी अडकल्या आहेत. स्मशानभूमीचे शेड मोडकळीस आलेले असून ते कधी कोसळतात याचा काही नेम नाही. शिवाय या स्मशानभूमींना संरक्षण भिंत नसल्याने कायम या ठिकाणी जनावरांचा वावर असल्याचे दिसून येते. तसेच पेव्हर ब्लॉक, पाण्याचा आणि विद्युत पुरवठा नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लालनगर स्मशानभूमीत अंधारात झाला अंत्यविधी
लालनगर – क्रांतीनगर भागातील मागासवर्गीयांसाठी लालनगर येथे स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या स्मशानभूमीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमीच्या शेडच्या भिंती पडल्या आहेत. परिसरात काटेरी झाडं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. शिवाय या ठिकाणी पाण्याची देखील सुविधा उपलब्ध नाही. स्मशानभूमी परिसरातील विद्युत पुरवठा बंद असल्याने काल सायंकाळी एक अंत्यविधी अक्षरश अंधारात पार पडला. अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगरपरिषद प्रशासनाने स्मशानभूमींच्या समस्या दूर कराव्यात
नगरपरिषद प्रशासनाने मागासवर्गीयांच्या स्मशानभूमींची पाहणी करून त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा करून वेळोवेळी समस्यांचा आढावा घ्यावा आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मागासवर्गीय जनतेतून करण्यात येत आहे.