अंबाजोगाई महाराष्ट्रातले तिसरे ‘पुस्तकांचे गाव’ जाहीर : राजकिशोर मोदी यांच्या पाठपुराव्याला यश

उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा

अंबाजोगाईकरांच्या वतीने केली होती निवेदनाद्वारे मागणी

टीम AM : अंबाजोगाईकरांची बऱ्याच दिवसांपासून अपेक्षा होती की, अंबाजोगाई शहर हे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून जाहीर करावे. याकरिता माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांनी वैयक्तिकरित्या कॅबिनेट मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जुलै 2024 मध्येही पत्राद्वारे मागणी केली होती. 

मोदी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले असून बुधवारी बीड शहरात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे आले असता त्यांनी अंबाजोगाई शहर हे तिसरे ‘पुस्तकांचे गांव’ होणार, आद्यकवी मुकुंदराज यांच्या नांवाने राज्यस्तरीय पुरस्कार देणार आणि माता श्री योगेश्वरी देवी, आद्यकवी मुकुंदराज व सर्वज्ञ दासोपंत समाधी परिसर विकासासाठी पुढाकार घेणार असे जाहीर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह आद्यकवी मुकुंदराज ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. किसन महाराज पवार, बीडच्या प्राचार्या डॉ. दिपा  क्षीरसागर, जेष्ठ साहित्यिक सतीश साळुंके, कवी साळगावकर, अतुल कुलकर्णी, संजय देवळनकर, शिवसेनेचे सचिन मुळुक, अनिल जगताप हे उपस्थित होते.

अंबाजोगाईकरांच्या या सर्व मागण्यांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकिशोर मोदी व मुकुंदराज संस्थानचे किसन महाराज पवार यांनी समस्त अंबाजोगाईकरांच्या  वतीने आभार व्यक्त केले आहेत.