टीम AM : मराठवाड्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सात महिला मजुरांचा मृत्यू झाला. वसमत तालुक्यातील गुंज इथले काही शेतमजूर आज सकाळी एका ट्रॅक्टरमधून नांदेड तालुक्यातील आलेगाव इथं जात असतांना, आलेगाव शिवारात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात महिलांचा मृत्यू झाला तर दोन महिला आणि एका पुरुषाला वाचवण्यात यश आलं आहे.
या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.