पिकअप – दुचाकीचा भीषण अपघात : सातेफळ येथील दोन वीटभट्टी कामगारांचा मृत्यू

टीम AM : कळंब – अंबाजोगाई महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. सावळेश्वर व औरंगपूर शिवाराच्या सीमेवर बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भरधावं पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. सुभाष आश्रुबा मोहिते [50] आणि सुनिल भीमराव पवार [40, दोघेही रा बार्शी, ह. मु. सातेफळ, वीटभट्टी, अंबाजोगाई ] अशी मृतांची नावे आहेत.

बार्शी येथील काही कामगार अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथील वीटभट्टीवर काम करतात. नातेवाईक आजारी असल्यामुळे येथील सुभाष आश्रुबा मोहिते आणि सुनिल भीमराव पवार हे दोन कामगार दुचाकीवरून [क्रमांक एम एच 25 / ए बी 4198] बार्शीला गेले होते. बुधवारी दोघेही परत सातेफळकडे निघाले. यावेळी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान सावळेश्वर व औरंगपूर शिवाराच्या सीमेवर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअकने [ क्रमांक एमएच 20 / जीसी 2108] जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस कर्मचारी सीताराम डोंगरे, गणेश राऊत, महादेव केदार, रामनाथ वारे यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

वीटभट्टीवर शोककळा

दरम्यान, दोन कामगारांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची बातमी अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारातील वीटभट्टीवर समजली. यामुळे वीटभट्टी परिसरात शोककळा पसरली आहे.