‘शक्तिपीठ’ महामार्ग अंबाजोगाईतूनच जाणार : भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा होणार सुरुवात, वाचा…

टीम AM : ‘शक्तिपीठ’ महामार्गाबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाची राज्यातील 12 जिह्यांतील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी दोन महिन्यांत मोजणी करून रक्कम निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे ‘शक्तिपीठ’ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘समृद्धी’ च्या धर्तीवर रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते गोवा अंतर 10 तासांत पार करण्यासाठी नागपूर ते गोवा शक्तिपीठ प्रकल्प हाती घेतला आहे. 86 हजार कोटींचा हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. 805 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी गतवर्षी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह राज्य सरकारकडे पाठवला. मात्र, महामार्गाला कोल्हापूर, सांगलीत विरोध झाल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो मागे घेतला होता. सरकारने सप्टेंबरमध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली. पण आता राज्य सरकारनेच हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचेही आदेश दिले आहेत. आदेशानंतर तत्काळ ‘एमएसआरडीसी’ ने पर्यावरण परवानगी संबंधीचा प्रस्ताव 10 जानेवारीला केंद्र आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आता त्यापुढे जात या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळाने ज्या जिह्यातून हा मार्ग जाणार आहे, त्या जिह्यातील जिल्हाधिकारी, भूसंपादनचे अधिकारी, भूमिअभिलेख अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. दोन महिन्यांत मोजणी करण्याचे रक्कम निश्चितीचे आदेश बैठकीत दिले. त्यामुळे पूर्व नियोजनाप्रमाणेच हा महामार्ग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंबाजोगाईतून जाणार महामार्ग

‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा – महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ माहूर, तुळजापूर व कोल्हापूर, तसेच मराठीतील आद्यकवी मुकुंदराज स्वामींचे व जोगाई देवीचे अंबाजोगाई, औंढा नागनाथ व परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंगे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर तसेच कारंजा (लाड), अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्तगुरुंची धार्मिक स्थळेही जोडली जातील.