टीम AM : दिग्दर्शक राज खोसला यांनी दिग्दर्शित सुनील दत्त आणि आशा पारेख यांचा ‘चिराग’ हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातल्या गाण्यांनीही श्रोत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. या चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती आणि त्याचे संगीत मदनमोहन यांनी तयार केले होते. या चित्रपटातील एक सुंदर गाणे आहे जे लता मंगेशकर आणि मोहंमद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले आणि आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या गाण्याचे शब्द होते – ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है’. हे गाणे रचताना गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना एका कठीण प्रसंगातून जावे लागले होते. काय होता तो प्रसंग ? जाणून घेऊयात आजच्या या लेखातून.
‘चिराग’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते त्याच सुमारास एके दिवशी राज खोसला साहेब एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे त्यांनी फैज अहमद फैज यांची ‘मुझसे पहली सी मोहब्बत मेरी मेहबूब न माँग’ ही नज्म म्हणजेच कविता ऐकली जी त्यांना खूपच भावली. ते त्या कार्यक्रमातून निघाले खरे, पण त्या कवितेतील एक ओळ मात्र वारंवार त्यांना आठवत होती. नकळत ती ओळ ते सारखी गुणगुणत होते. ती ओळ होती ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है.” ही ओळ त्यांना इतकी आवडली की आपल्या चित्रपटातल्या गाण्यात ती वापरायची असे त्यांनी निश्चित केले. फैज अहमद फैज यांच्या ‘नकाशे फरियादी’ या काव्यसंग्रहात प्रकाशित झालेली ती नज्म त्यांनी मजरूहजींना दिली आणि ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है’ ही ओळ वापरून गाणे तयार करण्याची फर्माईशही केली.
राज खोसलांची मागणी ऐकून मजरूह सुलतानपुरी आश्चर्यचकित झाले. इतर कवींनी लिहिलेल्या ओळी ‘जशाच्या तशा’ आपल्या गीतात वापरून त्याचं श्रेय आपण घेणे त्यांच्या तत्त्वात बसणारे नव्हते. त्यांनी राज खोसला यांना सांगितले की याच अर्थाचं दुसरं काहीतरी लिहिण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, पण त्या ओळी ‘जशाच्या तशा’ वापरू इच्छित नाही. यानंतर मजरूह सुलतानपुरी यांनी या ओळीवर आधारित काही गाणी लिहिलीही. पण राज खोसला यांना त्यातलं काहीच आवडले नाही. त्यांच्या मनात फक्त तीच एक ओळ घुमत होती, त्यांनी मजरूह साहेबांना ती ओळ जशीच्या तशी वापरून गाणं बनवण्याची विनंती केली.
मजरूहजींचे राज खोसला यांच्याशी असे संबंध होते की त्यांना नकारही देता येत नव्हता. एकीकडे त्यांना खोसलाजींच्या इच्छेचा मान राखायचा होता, पण त्यासाठी दुसऱ्या कवीच्या ओळी जशाच्या तशा वापरून ‘तुम्ही दुसऱ्यांच्या कविता चोरता’ असे लांछनही लावून घ्यायचे नव्हते. खोसलाजी हट्टालाच पेटले होते त्यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे होते.
मजरूहजींनी खूप विचार केला आणि शेवटी फैज साहेबांचीच रीतसर परवानगी घेऊन त्या ओळी वापरायच्या असं ठरवले. त्यांनी फैज अहमद फैज यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली आणि त्यांच्या कवितेतली ‘ती’ एक ओळ वापरण्याची परवानगी देण्याची विनंतीही केली. फैज साहेब मोठ्या मनाचे होते. त्यांनी मजरूह सुलतानपुरी यांना ती ओळ वापरण्याची सहज परवानगी दिली. फैज साहेबांची परवानगी मिळाल्यानंतर मजरूह सुलतानपुरी यांनी आपल्या लेखणीची जादू दाखवली आणि असे गाणे लिहिले जे हिंदी चित्रपटातील ‘क्लासिक’ गाण्यांपैकी एक बनले. हे गाणे रिलीज झाल्यानंतर फैज अहमद फैज यांनी मजरूह सुलतानपुरी यांना अभिनंदनाचा एक संदेशही पाठवला होता. आज आपण कॉपीराइटवरून होणाऱ्या वादांबद्दल दररोज इतक्या बातम्या ऐकतो त्यामुळे फैज अहमद फैज किंवा मजरूह सुलतानपुरी ही मंडळी किती महान होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
लेखिका : प्रज्ञा पंडित