टीम AM : 6 फेब्रुवारी रोजी सोयाबीन नोंदणी केलेल्या 44 हजार 744 पैकी फक्त 20 हजार 969 एवढ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून सरकारने सोयाबीन खरेदी केंद्र बंद केल्याने एकूण जिल्हाभरात उर्वरित असलेल्या साधारण 50 टक्के पेक्षाही जास्त सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं दिवाळं निघण्याची वेळ आली आहे.
सरकारी खरेदी केंद्र बंद असल्याने खाजगी व्यापारी सुद्धा खरेदीसाठी धजावत नाहीत आणि खरेदी केलीच तर हमीभावाच्या तुलनेत अत्यंत कमी किंमतीत म्हणजे साधारण 3800 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या शासकीय खरेदीची तारीख वाढवण्याकडे मोठ्या अश्याने त्यांचे डोळे लागले असताना, परवा पणन मंत्र्यांनी स्पष्टपणे खरेदीसाठी मुदत वाढ नसल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या संयमावरच घाव घातला आहे.

एवढ्यावरचं हे शोषण न थांबता ज्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यापासून शासकीय खरेदी केंद्रावर आपले सोयाबीन विक्री केले आहे, त्यांचे बिलं अद्याप देखील या सरकारने अदा केलेले नाही. त्यामुळे खरेदी झालेल्या शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे. संबंध राज्यभरात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाच्या विरोधात रोष दिसत असून त्याचे पडसाद आपल्या जिल्ह्यात आत्ता पाहायला मिळू लागले आहेत. नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनात जिल्हाभर आघाडीवर असलेली किसान सभा या सोयाबीन खरेदी केंद्र प्रश्नावर मैदानात उतरलेली आहे. किसान सभेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून या सरकारी धोरणाचा निषेध करून आज दिनांक 12 फेब्रुवारी बुधवार रोजी निदर्शने करण्यात आली.
1. केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदत वाढ देवुन संपूर्ण खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र चालू ठेवावे.
2. संपूर्ण सोयाबीन किमान हमीभावानेच खरेदी करा अन्यथा भावांतर योजनेअंतर्गत फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा.
3. गेल्या दोन महिन्यापासून खरेदी करत असलेल्या सोयाबीनचे थकीत बीलं तात्काळ देण्यात यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड उत्तरेश्वर इंगोले, रवींद्र देवरवाडे, जगन्नाथ घाळे, सय्यद खुर्शीद, आत्माराम पवार, ॲड. शिवाजी कांबळे, मस्के, राष्ट्रपाल पाटोळे, मुक्तार भाई, व्यंकटेश देशमुख यांच्यासह आदी जण उपस्थित होते.