टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे 25 ते 28 डिसेंबर रोजी केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ संलग्न 476 महाविद्यालयांपैकी 295 महाविद्यालयांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. तर तब्बल 181 महाविद्यालयांनी याकडे पाठ फिरवल्याने त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या संदर्भात कोणालाही पाठीशी घालू नका, अशा सूचना कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
या महोत्सवात चार जिल्ह्यांतील जवळपास 2 हजार कलावंत विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली. विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात सल्लागार समिती व संयोजन समितीची स्थापना केली आहे. यंदाचा महोत्सव देखील विद्यापीठाच्या मुख्य परिसरात होणार आहे. गेल्या वर्षाभरात इंद्रधनुष्य महोत्सव, ‘नॅक’, ‘दीक्षांत समारंभ’ यांसारखे मोठे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत.
यावर्षी प्रथमच महाविद्यालयांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आली होती. 7 ते 18 डिसेंबर या काळात महाविद्यालयांनी नोंदणी करून हार्ड कॉपी विद्यार्थी कल्याण विभागात जमा केली. मागील 12 दिवसांत 476 पैकी 295 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या 295 महाविद्यालयातील 1 हजार 880 कलावंत विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 1 हजार 13 विद्यार्थी तर 867 विद्यार्थिनींचा सहभाग आहे, तसेच 268 पुरुष व 168 महिला, असे 436 संघ व्यवस्थापक असणार आहेत.