टीम AM : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा येत्या 26 जानेवारीला अस्तित्वात येणार आहे. तशा हालचालीही युद्धपातळीवर मंत्रालयात सुरू आहेत. उदगीर जरी जिल्हा होत असला तरी त्याची चर्चा अंबाजोगाईत होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मराठवाड्यातील सर्वात अगोदर असलेली अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी मागे पडली आहे. लातूर, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांची निर्मिती होवून बराचसा काळ लोटला तरी अंबाजोगाई जिल्हा मात्र झाला नाही. आता मराठवाड्यात अजून एक नवीन जिल्ह्याची भर पडणार आहे. पण अंबाजोगाईकरांच्या नशीबाला केवळ आश्वासनांची खैरातच आहे. अंबाजोगाई जिल्हा कधी होणार ? याचं उत्तर अजूनही अंबाजोगाईकरांना मिळालेलं नाही. अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीची फक्त चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाईकरांना ऐकवयास मिळत आहे.
अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करावी, ही मागणी गेल्या 35 वर्षांपासून अंबाजोगाईकर सातत्याने करत आहेत. यासाठी अनेक तीव्र आंदोलने झाली. जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकरांचे शिष्टमंडळ बहुतांश मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनी जिल्हा जाहीर करण्याचे आश्वासन दिले, मात्र ते हवेतच विरघळले. माजी मंत्री विमल मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्वच शासकीय कार्यालयाची उभारणी केली, ते कार्यरत आहेत. नवीन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करण्यासाठी शासकीय तिजोरीवर कुठलाही आर्थिक ताण पडणार नाही. 6 जानेवारी 2009 ला तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी बीड जिल्हा विभाजनाचा अहवाल शासनाकडे पाठवला होता. विभागीय आयुक्त दिलीप बंड समितीने दिलेल्या निकषानुसार अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी अंबाजोगाई जिल्हा कृती समिती सातत्याने करित आहे. पण, त्या मागणीला अजूनही यश आले नाही.
उदगीर जिल्ह्याची निर्मीती 26 जानेवारीला होणार आहे, अशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्याने अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. पण येथील लोकप्रतिनिधींनी जिल्हा निर्मीतीच्या प्रश्नाला बगल दिल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न शासनदरबारी धूळखात पडला आहे. उदगीर जिल्ह्यासोबत अंबाजोगाई जिल्ह्याचीही घोषणा करण्यात यावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे, हे मात्र निश्चित आहे.