टीम AM : ‘फोफसंडी’ महाराष्ट्रातील सर्वात कमी सुर्यप्रकाश मिळणारे म्हणजेच सर्वात उशीरा सुर्योदय आणि सर्वात आधी सुर्यास्त होणारे गाव. सूर्योदय दोन – अडीच तास उशिरा व सूर्यास्त दोन – अडीच तास लवकर होतो. म्हणजे दिवस हा फक्त सहा ते सात तासांचाच असतो.
कुंजीरगडाच्या पायथ्याशी असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम छोटे खेडेगाव. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. नाशिक पासून साधारणपणे 110 किमी अंतरावर असलेले हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात येते. मांडवी नदीचा उगम या गावाच्या हद्दीत होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नांवावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी तुफान पाऊस पडतो. निसर्ग सौंदर्याची या गावावर मुक्तहस्ते उधळण केलेली आहे.
‘फोफसंडी’ गावाला हे नाव मिळण्याचा इतिहास देखील खूपच रंजक आहे. पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी (संडे) सुट्टीच्या दिवशी विश्रांतीसाठी या गावात जात असे. त्यावरूनच या गावाचे नाव फॉपसंडे पडले. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन ‘फोफसंडी’ हे नाव रूढ झाले. त्या ब्रिटिश अधिकारी राहत असलेल्या गेस्ट हाऊसचे अवशेष अजून शिल्लक आहेत.
मजकूर सौजन्य : अशोक दारके