टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर आणि परळी तालुक्यातील मैंदवाडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील शेतकरी अच्युत होळंबे यांच्या शेतातील शेळीचे चार महिन्यांचे पिल्लू उचलून नेले. तसेच विठ्ठल पवार यांच्या म्हशीच्या वासरावर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.
शेतकऱ्यांना याच परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्याचे दर्शन झाले होते. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन आढळलेल्या पावलांच्या ठश्यांवरून बिबट्याचा वावर या भागात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांनंतर अचानकपणे जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याने आता परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ कारवाई करून बिबट्याचा शोध घ्यावा आणि त्याला जेरबंद करावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.