टीम AM : 11 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची सुरुवात ‘जागर दिंडी’ ने करण्यात आली. ज्येष्ठांच्या सन्मानाचा संदेश देत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या ‘जागर दिंडी’ ला सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थी, वाद्यवृंद पथक, स्वागत समितीचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि साहित्यिकांचा ‘जागर दिंडी’ त सहभाग दिसून आला. ‘जागर दिंडी’ ची सुरवात माजी स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. आय. खडकभावी यांच्या हस्ते करण्यात आली. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतराव जगतकर यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ‘जागर दिंडी’ त सहभागी झाले होते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने प्रति दोन वर्षी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. लोकाश्रयावर आधारीत असलेले हे 11 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन यावर्षी 14 व 15 डिसेंबर रोजी अंबाजोगाई शहरात नगरपरिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
11 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या संमेलनाचं उद्घाटन डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते होणार असून समारोप डॉ. आदित्य पतकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी ही माहिती दिली. साहित्यिक बालाजी सुतार हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. 15 डिसेंबर रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे. या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.