टीम AM : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यात येत आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातल्या विविध संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी शिक्षणाला विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे.
यानुसार, आता विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेतील आणि ज्ञानक्षेत्रातल्या ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध होतील. दुहेरी पदवीच्या शिक्षणाअंतर्गत आता विद्यार्थ्यांला दोन महाविद्यालये किंवा दोन उच्च शिक्षण संस्थामध्ये एकत्र प्रवेश घेता येणार असून त्यांना शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर दोन पदव्या मिळणार आहेत. दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमाअंतर्गत दोन्ही पदव्या दुरस्थ शिक्षण पद्धतीनं किंवा एक प्रत्यक्ष आणि दुसरी दुरस्थ शिक्षण पद्धतीनं मिळवता येणार आहे.
याव्यतिरिक्त, या तरतुदीअंतर्गत दोन्ही पदव्या प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीद्वारे एकाच वेळी विद्यार्थ्यांना मिळवता येणार आहे. पण यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रितसर मंजुरी घेऊन शैक्षणिक सामंजस्य करार करणं गरजेचं राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.