मंदिरात आराध बसण्यासाठी महिलांची गर्दी
टीम AM : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. रविवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार विलास तरंगे व मयुरी तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवास प्रारंभ झाला.
मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास 4 हजार महिला आराध बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली. रविवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहरवासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या.
यावेळी झालेल्या महापूजेत तहसीलदार तथा देवल कमिटीचे अध्यक्ष विलास तरंगे, मयुरी तरंगे यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे सचिव प्रा. अशोक लोमटे, कोषाध्यक्ष शिरीष पांडे, विश्वस्त संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, अमोल लोमटे, सतीश लोमटे, प्रवीण दामा, हंसराज देशमुख, राजपाल भोसले, मुख्य पुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवीचे पुरोहित, मानकरी व भक्त उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.
महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची, पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे, सचिव प्रा. अशोक लोमटे यांनी दिली आहे.