खळबळजनक‌ : ‘स्वाराती’ रुग्णालयात खरेदी केली बनावट औषधं, चौघांवर गुन्हा दाखल, वाचा…

टीम AM : बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील औषध भांडारातील काही औषधी वर्षभरापूर्वी तपासणीसाठी ताब्यात घेतली होती. सदरील तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून भांडारातील सदरील औषधं बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. औषधं पुरवठा करणाऱ्या पेढींनी व अज्ञात व्यक्तींनी संगनमताने बनावट औषधांची खरेदी‌ – विक्री केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

सदरील बनावट औषधं सेवन केल्यास मानवी आरोग्यास धोका होवू शकतो हे माहित असतांना देखील जनतेची व रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी बीड येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून दि. 5 डिसेंबर 2024 रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी [रा. भिवंडी, जि. ठाणे], द्विती सुमित त्रिवेदी [रा. सुरत] आणि विजय शैलेद्र चौधरी [रा. मिरा रोड, ठाणे] या चौघांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने यासोबत रुग्णालयाने लाखो रूपयांची औषधं खरेदी केल्याची बिले यासह अन्य कागदपत्रे देखील पोलिसांना दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई पोलिस करित आहेत.

जनतेची फसवणूक 

अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयामधील औषध भांडारात हा प्रकार घडला आहे. आरोपीतांनी संगनमताने बनावट औषधांची खरेदी – विक्री केली आहे. बनावट औषधं सेवन केल्याने मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, हे माहित असूनही सदरील बनावट औषधं खरे आहेत, असे भासवून जनतेची फसवणूक केल्याचे बीडचे औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here