टीम AM : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर सदस्यांच्या शपथविधीला सुरूवात झाली.
अस्थायी अध्यक्षांच्या तालिकेवरील सदस्यांच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली. आज शनिवारी आणि उद्या रविवारी उर्वरीत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
दरम्यान, नव्याने गठित विधानसभेच्या अध्यक्षांची परवा नऊ डिसेंबर रोजी निवड केली जाणार आहे. त्यासाठी उद्या दुपारी बारा वाजण्यापूर्वी प्रस्ताव सादर करण्याचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भातील घोषणा आज केली, तर येत्या 16 डिसेंबरच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.