टीम AM : केज विधानसभा मतदारसंघाची 2024 ची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अतितटीची झाली. या निवडणुकीत भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा निवडून आल्या तर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा केवळ 2700 मतांनी निसटता पराभव झाला. या निवडणुकीची चर्चा मात्र केज मतदारसंघात चांगलीच झाली. कोण कुठे कमी पडले तर ऐनवेळी कोणी कोणाला पाठिंबा दिला ? याची चर्चा अजूनही मतदारसंघात होताना दिसून येत आहे. पण अशातच केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. केज विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे केज मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणुकीच्या मतदानाची जोरदार चर्चा सुरू झाली असून निवडणूक अधिकारी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, बीड जिल्हाधिकारी यांना आम्ही रितसर तक्रार दिली असून केज मतदारसंघातील काही गावांतून महाविकास आघाडीला भरभरुन मतदान होणार होतं. त्या गावांतून कमी प्रमाणात मतदान झालं, हे संशयास्पद असल्याने आम्ही फेरमतमोजणीची मागणी केली आहे, असं पृथ्वीराज साठे यांनी सांगितले.
पुढे बोलताना साठे म्हणाले की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी जनतेच्या भेटीगाठीसाठी बाहेर पडलो आणि त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आभार दौरा काढला. या दरम्यान गावोगावी फिरत असताना मतदारांनी भरभरून मला मतदानरुपी आशिर्वाद दिले, असं दिसून आलं. मतदारांनी बोलत असताना सांगितले की, आम्ही तर पुर्ण तुम्हाला मतदान केले आहे ? पण हे झालं कसं ? अशा पध्दतीचे प्रश्न सर्वच मतदारांना पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘ईव्हीएम’ मशीनच्या बाबतीत जे बोललं जातं, त्यात खरोखरच सत्यता आहे, अशा पध्दतीचं लोक त्या ठिकाणी बोलून दाखवतात. त्यामुळे केज मतदारसंघातील 10 मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटच्या मोजणीची मागणी केली आहे आणि ‘त्या’ ठिकाणी मला चांगले मतदान मिळण्याची अपेक्षा आहे. ‘त्या’ ठिकाणी मला कमी मतदान झाल्याचं पहायला मिळालं, ते विश्वासाचं बसत नसल्याने आम्ही फेरमतमोजणीची त्या ठिकाणी मागणी केली आहे, असं पृथ्वीराज साठे यांनी सांगितले आहे. दरम्यान, आता पृथ्वीराज साठे यांच्या मागणीवर निवडणूक अधिकारी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.