‘चैत्यभूमी’ : महामानवाला अभिवादन, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, वाचा…

टीम AM : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्धवंदना पार पडली. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

‘इंदू’ मिल स्मारक प्रेरणादायी ठरेल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

एक उत्तुंग अभ्यासक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या राष्ट्रासाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. ते जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल, यासाठी त्यांचे प्रयत्‍न होते. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या आहेत. ‘इंदू’ मिल स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे यावेळी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या संविधानाच्या मार्गामुळे देश जगातील महाशक्ती बनू शकतो. त्यांच्या कार्यकाळात अनेक पायाभूत गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘इंदू’ मिल स्मारकाचे कार्यही अत्यंत वेगाने आपल्याला पूर्ण करायचे आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांचे विचार जागृत ठेवणे तसेच ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणाचा मार्ग जगाला दाखवला. त्यांचे विचार व भारतीय संविधानाच्या आदर्शावर सरकारचा कारभार सुरु आहे. राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, याची काळजी कायम घेतली आहे. – उपमुख्यमंत्री अजित पवार