टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळजनक घटना पुन्हा समोर आली आहे. मौजे कुंबेफळ गावात एका हरणाचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, मृत पावलेल्या हरणाचा फडशा बिबट्याने पाडला की, अन्य मोकाट जनावराने या बद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. या संदर्भात वनाधिकारी विजया शिंगाटे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी ‘त्या’ हरणाचा फडशा मोकाट कुत्र्याने पाडला असल्याची माहिती दिली आहे.
अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या माकेगाव गावात काही दिवसांपूर्वी बिबट्याने बैलाचा फडशा पाडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यासाठी देखील घाबरत आहेत. अशातच अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या कुंबेफळ गावात एका हरणाचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे कुंबेफळ परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतू, ‘त्या’ हरणाचा फडशा मोकाट कुत्र्याने पाडला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
अफवा पसरवू नका
अंबाजोगाई परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेच्या अनुषंगाने इतरत्र ठिकाणचे जुने बिबट्याचे व्हिडीओ शेअर केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणीही अशा अफवा किंवा व्हिडीओ शेअर करून नयेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.