टीम AM : भाजपचे महाराष्ट्रातील नंबर वनचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी तिघांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 13 दिवसांनी ‘महायुती’ सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संत – महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात झाली आहे.