टीम AM : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीचे तिन्ही पक्ष आपापल्या विधीमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत, असं शिंदे यांनी सांगितलं.