विधानसभा निवडणूक : पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी, वाचा… 

टीम AM : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होईल. यात पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच ते सहा ठिकाणी अप्रिय घटना घडल्या. त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होईल. प्रत्येक ठिकाणी 14 टेबलवर ही प्रक्रिया सुरु होईल. सुरवातीला टपाली मतमोजणी होईल, त्यानंतर ‘इव्हीम’ मशीन वरील मतमोजणी सुरु होईल.

मतदान प्रक्रिया दरम्यान अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, निकृष्ट जेवण, लाईटची सुविधा नव्हती. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पाठक यांनी दिली.

बीड, माजलगाव, गेवराई या ठिकाणी 29 फेऱ्या होतील. तर आष्टीमध्ये सर्वाधिक 34 फेऱ्या होतील. केज आणि परळी या ठिकाणी 28 फेऱ्या होतील. सर्वात पहिला निकाल हा परळीचा अपेक्षित असून शेवटचा निकाल आष्टीचा लागेल. मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पाठक यांनी दिली आहे.