विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावी – बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल तर दहावीच्या परीक्षेसाठी 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी – बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.

त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या 23 ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या. प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे.

असे आहे दहावी – बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक…

बारावी लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025

बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025

दहावी लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025

दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी