एक साधा, सर्वसाधारण उमेदवार पृथ्वीराज साठे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा : रोहित पवार
प्रचार सभेत ‘इस बार साठे को वोट भी देंगे और नोट भी देंगे’ चा नारा’
टीम AM : महायुती’ सरकारने शेतकरी, कष्टकरी बांधवांची घोर फसवणूक व निराशा केल्यामुळे शरदचंद्र पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे 170 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार असल्याचे स्पष्ट मत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. एक सर्वसामान्य साधारण उमेदवार पृथ्वीराज साठे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन रोहित पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे केज मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचारसभेत रोहित पवार बोलत होते.
या प्रसंगी खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार संगिता ठोंबरे, डॉ. अंजली घाडगे, राजकिशोर मोदी, हारून पटेल, सुरेश पाटील, डॉ. नरेंद्र काळे, बबन लोमटे, संजय भोसले, डॉ. राजेश इंगोले, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, भाई मोहन गुंड, कॉ. बब्रुवान पोटभरे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, पृथ्वीराज साठे हे आमदार होणारच आहेत. साठे हे सर्वसामान्य व साधे उमेदवार आहेत. लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची उर्मी व धडपड असलेला माणूस आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार मानणारा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने मोदींनी आता महाराष्ट्राचा नाद सोडला असल्याचे पहावयास मिळत आहे. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी देण्यात येईल. तसेच माता – भगिनींसाठी 3 हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार असून महिला सुरक्षित कशा राहतील यावर देखील मोठ्या प्रमाणावर काम केले जाईल. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. शेतमालाला भाव नाही. या सर्व बाबींवर महाविकास आघाडीचे सरकार तत्परतेने काम करणार असल्याचे पवार यांनी यावेळी उल्लेखित केले.
या जाहीर सभेत केज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व त्यांच्या कुटुंबांकडून सर्वसामान्य मतदारांचा अवमान केला जात असून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीचे तुमचे – आमचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देण्याची जबाबदारी सर्व मतदारांची आहे, असे भावनिक आवाहन आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी केले. महायुती सरकारमध्ये राज्यात 50 हजार कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे. केज मतदार संघाच्या आमदार सत्तेत असताना शेतकऱ्यांना विमा अनुदानाचे पैसे मिळवून देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी यांचा विश्वासघात झाला असल्याने त्यांनी विकासाच्या पोकळ गप्पा मारू नयेत, असा मार्मिक टोलाही पवार यांनी लगावला. साठे यांना आमदार करा, केज मतदारसंघात ‘एमआयडीसी’ आणल्याशिवाय राहणार नाही. तसेच अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
यावेळी राजे भूषणसिंह होळकर यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे दूरध्वनीवरून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत पृथ्वीराज साठे यांना सहकार्य करून निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महाराज भूषणसिंह होळकर यांनी जाहीर केले.
साठे यांचा सामना धनदांडग्या शक्तीशी : सोनवणे
प्रचारसभेत बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, केज मतदारसंघात पृथ्वीराज साठे यांना डोक्यावर घ्यायचं काम इथल्या मतदारांनी केले आहे. साठेंना सर्वपक्षीय संघटना यांच्याकडून पाठिंबा दिल्या जात आहे. मतदारसंघातील राक्षसी वृत्तीच्या माणसाला वठणीवर आणण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी बिनशर्त मागे घेऊन साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. साठे यांचा सामना अत्यंत धनदांडग्या शक्तीशी होत आहे. विद्यमान आमदार या मी आणि माझ कुटुंब ही आमची पार्टी असल्याचा अविर्भाव गाजवताना दिसून येत आहेत. यावेळी बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत अक्षय मुंदडा यांनी सभेत केलेल्या आरोपाचे खंडन करत त्यांचा भरपूर समाचार घेतला.
केज मतदारसंघाचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत : पृथ्वीराज साठे
महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे म्हणाले की, कर्जत – जामखेड मतदारसंघात दादांनी हेवा वाटावा, असा विकास केला. तरुण, महिला यांना रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र, केज मतदारसंघाचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत, जिल्हानिर्मिती, ‘एमआयडिसी’, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारा उद्योग निर्माण झाला नाही. सिंचन सुविधा वाढल्या नाहीत. बुटेनाथ साठवण तलाव झाला तर 2 लाख हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन साठे यांनी उपस्थित जनसमुदायास दिले. मतदारसंघात खरोखरच विकास झाला असेल तर देशाच्या केंद्रीय मंत्र्याला माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाच्या विरोधात बोलण्याठी व त्यांचा प्रचार करण्यासाठी का आणले जाते ? असा सवाल पृथ्वीराज साठे यांनी केला. या सभेत पारुबाई पांडे यांच्यातर्फे 50 हजार, डॉ. राजेश इंगोले यांच्यातर्फे 50 हजार रुपये देताना ‘इस बार साठे को वोट भी देंगे और नोट भी देंगे’ चा नारा दिला. यावेळी कैलास लव्हरी यांनीही 75 हजार रुपये पृथ्वीराज साठे यांना दिले.
या प्रसंगी माजी आमदार संगिता ठोंबरे, राजकिशोर मोदी, कॉ. बब्रुवान पोटभरे, माजी आमदार उषा दराडे, डॉ. राजेश इंगोले यांच्यासह अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या सभेत संजय भोसले, रमिज सर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश झाला. या प्रचारसभेचे सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार बन्सी जोगदंड यांनी मानले. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.