विधानसभा निवडणूक : सत्ता आल्यानंतर डोक्यात जाऊ द्यायची नाही, परळीतील सभेत काय म्हणाले शरद‌‌ पवार ? वाचा…

टीम AM : बीड जिल्ह्याने एकेकाळी आमचे सर्व आमदार निवडून देण्याचं काम केले होते. दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली आहे. सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली. लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. परळी मतदारसंघातील शेतीचे, रोजगाराचे आणि विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परळी येथे आयोजित जाहीर सभेत केले.

परळी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे‌ उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन परळी येथील मोंढा मैदानात आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी केले होते. या सभेला खासदार फौजीया खान, खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे, सुदामत्ती गुट्टे, राजाभाऊ फड, सुनिल गुट्टे, फुलचंद कराड यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.‌ 

आपल्या विस्तारीत भाषणात शरद पवार म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी परळीला येणे झाले आहे. आताची परळी पुर्वीसारखी राहिली नाही, इथं गुंडगिरी वाढली आहे. इथले‌‌ प्रश्न अजूनही प्रलंबित असून सत्ताधाऱ्यांना ते सोडविण्यात अपयश आले आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, एक दिवशी माझ्या मुंबईतील घरी एकदा पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे आले होते. त्यांनी सांगितले की, आमच्यावर काही अडचणी आहेत. त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. मी म्हणालो कसली मदत ? ते म्हणाले, हा माझा मुलगा आहे. याच्याकडे लक्ष ठेवा. पंडित अण्णा यांच्या सांगण्यावरुन आम्ही लोकांसाठी नेतृत्व दिले. मी त्यांना संधी दिली, पक्षात घेतलं. विरोधी पक्षनेता केलं. त्यांना आमदार केले, मंत्री केले. ऐकेकाळी बीड जिल्ह्याने माझे सर्व आमदार निवडून दिले होते. त्यामुळे तरुण पिढीचं नेतृत्व म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. दुर्दैवाने परिस्थिती बदलली. सत्ता आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. त्यांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली. आज तुमच्या भागात अनेक प्रश्न आहेत. त्याच्या मागे कोण आहे ते लोक सांगतील, असंही शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक राष्ट्रवादीची ताकद : बजरंग सोनवणे 

बजरंग सोनवणे म्हणाले, पवार साहेबांनी या मतदारसंघाला आमदार, मंत्री पद दिले. सर्व काही दिले तरी साहेबांना धोका देण्याचे पाप केले. सरकार येत असतात आणि जात असतात. तुम्ही भयभीत होऊन काम करू नका. पालकमंत्री म्हणाले होते की, परळी मतदार संघ भाजप मुक्त करू. बीड जिल्ह्यात सर्वाधिक राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन सोनवणे यांनी यावेळी केले.

मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सेवा करण्यासाठी संधी‌ द्या : राजेसाहेब देशमुख 

परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत प्रश्न ‌प्रलंबित आहेत. युवकांच्या हाताला काम नाही, शेतकरी बांधव संकटात सापडला आहे.‌ परळी मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी, असं आवाहन करीत येणाऱ्या 20 नोव्हेंबरला तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर मतदान‌ करण्याचं आवाहन उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायास केले.‌ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.