‘सूट जपून ठेवा, मी खरेदी करायला येईन’ : ‘किंग’ खानने 100 रुपये घेतले होते उधार, वाचा…

टीम AM : बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खान याचा 2 नोव्हेंबर रोजी 59 वा वाढदिवसा आहे. या दिवशी शाहरुखला पाहण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मुंबईतील बंगल्या बाहेर मोठ्या संख्येने चाहते पोहोचतात. दिल्लीहून मुंबईत आलेला एक साधा तरुण ते बॉलिवुडचा ‘किंग’ होण्यापर्यंतचा शाहरुखचा प्रवास सोपा नव्हता. त्याला मुंबईत आल्यावर खूप स्ट्रगल आणि खूप मेहनत करावी लागली. मुंबईत आल्यावर शाहरुख खानला सलमान खानसह इंडस्ट्रीतील काही जणांनी मदत केली होती. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्या.

दिल्ली ते मुंबई प्रवास

दिल्लीहून स्वप्ननगरी मुंबईत आल्यानंतर शाहरुख खानला आपलं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. मन्नतमध्ये राहण्याआधी किंग खान दिग्दर्शक-निर्मात्यांच्या घरी राहत असे. ‘राजू बन गया जेंटलमन’ या चित्रपटाचे निर्माते विवेक वासवानी यांनी एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. विवेक वासवानी यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला जेव्हा शाहरुख खान दिल्लीहून मुंबईत आला, तेव्हा पैसे फार जपून खर्च करायचा. शाहरुख खानचं लग्न होण्याच्या आधीपर्यंत तो ‘राजू बन‌ गया जेंटलमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक अझीझ मिर्झा यांच्या घरी आणि नंतर विवेक वासवानी यांच्या घरी राहिला. विवेक वासवानी आणि शाहरुख खान चित्रपट पाहायला गेले असताना किंग खानने त्यांच्याकडे 100 रुपये मागितले होते.

100 रुपये मागितले होते उधार

शाहरुख खान त्याच्या संघर्षाच्या काळात खारमध्ये राहत होता. त्याने खारमध्ये एक दुकान पाहिले. तिथे एक सूट टांगलेला होता, जो त्याला खूप आवडला होता. तो दुकानदाराकडे गेला आणि त्याला म्हणाला, हा सूट सांभाळून ठेवा, वर्षभरानंतर माझा चित्रपट येईल आणि मग मी हा सूट विकत घेईल. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर त्याने वर्षभरात चित्रपट केला. 1992 मध्ये शाहरुख खानचा ‘दिवाना’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावलं.

संघर्षाच्या काळात सलमानने केली मदत

सलमान खान आणि शाहरुख खान चांगले मित्र आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्षाच्या काळात सलमानने शाहरुखला मदत केली होती. शाहरुख जेव्हा‌ मुंबईत नवीन आला होता आणि स्ट्रगल करत होता, तेव्हा सलमानने त्याची फार काळजी घेतली होती. शाहरुख अनेक वेळा सलमान खानच्या घरी जेवला. शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, ‘मी आज इथे आहे, ते सलमान आणि त्याच्या कुटुंबामुळे आहे, कारण मी यांच्या घरचं अन्न खाल्लं आहे’. यानंतर स्ट्रगल आणि मेहनतीच्या बळावर शाहरुखने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:च नाव कमावलं आणि बॉलिवूडचा ‘किंग’ बनला.