एका मिनिटाची काय किंमत ? : माजी आमदार‌‌ उमेदवारी अर्ज भरण्यास मुकले, वाचा… 

टीम AM : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच एक निवडणूकीच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीची चर्चा सबंध राज्यभरात होत आहे. एका मिनिटाची काय किंमत मोजावी लागते याची प्रचिती राजकारण्यांना आली आहे. माजी मंत्री राहिलेले, तीनवेळा आमदारकी भुषविलेले माजी आमदार अनीस अहमद यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्रात अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर होती. दुपारी 3 वाजेपर्यंतच अर्ज घेतले जाणार होते. परंतू अहमद हे तीन वाजल्यानंतर एक मिनिटाने नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. अधिकाऱ्यांनी तीन वाजताच गेट बंद केल्याने अहमद हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत. अहमद यांनी जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

अनीस अहमद हे नागपूर मध्य मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत. काँग्रेसमधून तिकीट मिळत नसल्याचे पाहून त्यांनी मुंबई गाठत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. वंचितची उमेदवारी त्यांना जाहीर झाली होती.

अहमद यांनी केलेल्या दाव्यानुसार ते वेळ संपण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचले होते. तिथे सुरक्षा यंत्रणेने त्यांना सुरक्षा तपासणीमध्ये विलंब केला. आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले होते. तिथे बेंचवरून वाद झाला आणि काही मिनिटे उशीर झाल्याने मला उमेदवारी अर्ज भरता आला नाही, असा दावा अहमद यांनी केला आहे.

सुरक्षा रक्षकांनी माझ्यासोबत आलेल्या पाच जणांवर आक्षेप घेतला व मला विनाकारण 3 वाजेपर्यंत तिथेच रोखून ठेवले, असा आरोप अहमद यांनी केला आहे. काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अहमद यांनी वंचितकडून उमेदवारी मिळविली होती.