टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात डोक्यात दगड घालून एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंगर पिंपळा गावात घडली असून यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सचिन शिवाजी तिडके (वय – 35) असे आहे. सणासुदीच्या काळात ही घटना घडली असल्याने डोंगर पिंपळा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा गावात मयत सचिन शिवाजी तिडके हा पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. सचिन तिडके हा भोगलवाडी गावचा रहिवासी होता आणि डोंगर पिंपळा या गावचा जावई असल्याकारणाने तो गावात वास्तव्यास होता. काल रात्रीपासून सचिन तिडके हा बेपत्ता होता. आज दुपारी 1 वाजता त्याचा मृतदेह डोंगर पिंपळा शिवारात आढळून आला आहे. यात त्याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मयत सचिन याच्या पश्चात दोन मुलं, पत्नी, आई – वडील ,भाऊ – भावजय असा परिवार आहे. ऐन दिवाळीचा आनंदाचा सण साजरा होत असताना तिडके कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.