मोठी बातमी : कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा, ‘या’ निवडणूका पुढे ढकलल्या

टीम AM : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मात्र, या अगोदरच एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील 29 हजार 429 निवडणुका सध्या प्रलंबित असून गेल्या काही महिन्यांपासून त्या सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. आता, विधानसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील निवडणुकांचा गुलाल उधळण्याअगोदर विधानसभा निवडणुकांचा गुलाल उधळणार आहे.

सध्या राज्यातील 7 हजार 109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या. त्यामध्ये, दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक व पतसंस्थांच्या निवडणुकी घेण्यात येणार होत्या. मात्र, राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे, 31 डिसेंबर 2024 नंतरच या निवडणुका होणार आहेत.