टीम AM : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाची चाचपणी केली जात असून प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. केज विधानसभा निवडणुकीतही यंदा तगडी लढत पाहायला मिळणार आहे. त्यासाठी ‘महायुती’, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ‘महायुती’ च्या वतीने भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची उमेदवारी फिक्स मानली जात असली तरी कालच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केज विधानसभेसाठी दावा केला असून पपु कागदे यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे ‘महायुती’ तही उमेदवारी बाबतीत शाशकंता निर्माण झाली आहे.
केज विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यासाठी उमेदवारांनी गेल्या दोन महिन्यापासून तयारी करीत मतदारसंघ पिंजून काढला आहे. यात प्रामुख्याने माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगिता ठोंबरे, डाॅ. अंजली घाडगे, रमेश गालफाडे यांच्यासह आदी उमेदवारांंचा समावेश आहे. महाविकास आघाडी कडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार आहे, असे प्रत्येक जण सांगतही आहेत, त्यामुळे नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
केज विधानसभेची जागा महाविकास आगाडीत शरद पवार यांच्या गटाकडे आहे. त्या अनुषंगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वत: शरद पवार यांनी पुणे येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शरद पवार यांनी स्वत: प्रश्न विचारून मतदार संघाच्या बाबतीतचा अभ्यास उमेदवारांकडून जाणून घेतला. जवळपास 12 उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यात माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगिता ठोंबरे, डाॅ. अंजली घाडगे यांच्यासह आदींचा समावेश आहे. यातूनच महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे केज विधानसभेच्या निवडणुकीत यंदा तगडी लढत पाहायला मिळणार आहे, हे मात्र निश्चित आहे.