टीम AM : महानायक अमिताभ बच्चन आज वयाच्या 82 व्या वर्षीही कार्यरत आहेत. सिनेमाच्या शूटिंगला वेळेआधी सेटवर जाणं, त्यांचं कामाप्रति समर्पण याबाबतचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन हे निर्व्यसनी आहेत आणि या त्यांच्या चांगल्या सवयींची त्यांच्या चाहत्यांनाही माहिती आहे. मात्र, या महानायकानं एकेकाळी दिवसाला 200 सिगारेट ओढल्या होत्या. खुद्द ‘बिग बी’ यांनीच एका जुन्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
फार कमी लोकांना माहीत आहे की, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन व्यसनांच्या आहारी गेले होते. सध्या सोशल मीडियावर 1980 साली ‘इंडिया टुडे’ ला दिलेली त्यांची ही मुलाखत प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीत अमिताभ यांनी धूम्रपान, मद्यपान आणि मांसाहार यासंबंधीचा आपला अनुभव मोकळेपणानं सांगितला होता.
एकेकाळी मांसाहारी होते ‘बिग बी’
1980 साली दिलेल्या ‘त्या’ मुलाखतीत अमिताभ बच्चन सांगतात, ‘मी पूर्वी मांसाहारी होतो, पण पुढे जाऊन मी ही सवय सोडली. त्यामागे कुठलंही धार्मिक कारण नव्हतं. फक्त मला मांसाहाराची चव आवडत नसे म्हणून मी शाकाहारी झालो. माझे वडील शाकाहारी होते तर आई मांसाहारी होती. जयासुद्धा मांसाहारी आहे. परदेशांत गेल्यावर मात्र शाकाहारी जेवण मिळविण्यात मला अडचण येते.’
दिवसाला 200 सिगारेट्स आणि मद्यपान
‘त्या’ मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी मांसाहाराबरोबरच दारू आणि सिगारेटच्या व्यसनाबद्दलही सांगितलं. ते म्हणतात, ‘कलकत्त्यात असताना मी दिवसाला 200 सिगारेट ओढत होतो. होय, बरोबर ऐकलंत, 200 सिगारेट ! पण मुंबईत आल्यावर मी ते सोडून दिलं. मी दारूही प्यायचो, जे मिळेल ते प्यायचो. पण काही वर्षांपूर्वी मला जाणवलं की, मला याची खरंच गरज नाही. म्हणून मी या सर्व सवयी सोडल्या.’
अमिताभ बच्चन लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘वेट्टैयन’ चित्रपटात झळकणार आहेत. 1991 मध्ये आलेल्या ‘हम’ नंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकत्र काम करीत आहेत.