टीम AM : जोगाईवाडी ग्रामपंचायतीत महापुरुषांच्या शेजारी फोटो लावण्याप्रकरणी ज्ञानोबा कांबळे यांनी रितसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने माजी सभापती ज्ञानोबा कांबळे यांनी आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याचे ज्ञानोबा कांबळे यांनी सांगितले.
या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोगाईवाडी ग्रामपंचायतीत महापुरुषांच्या शेजारी फोटो लावण्याप्रकरणी रितसर तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून आली नाही. थोर महापुरुषांच्या शेजारी फोटो लावून अवमान केल्यामुळे सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतू, माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पोलिस प्रशासन आमदारांचे सासरे, पती आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी एक अनुसूचित जातीचा दलित व्यक्ती असल्यामुळे माझ्या अर्जाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे माझ्या भावना तीव्र दुखावल्या आहेत. माझं वय 75 वर्षे असून सुद्धा लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ माझ्यावर आणली आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मी लाक्षणिक उपोषण करीत आहे, यांची जबाबदारी प्रशासनावर आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर ज्ञानोबा कांबळे यांची स्वाक्षरी आहे. उपोषणस्थळी शिवसेना [उबाठा] गटाचे मदन परदेशी, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन कल्याणराव भगत, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जोगदंड यांच्यासह आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.