भाजपचा नवीन फॉर्मुला : बंद लिफाफा ठरवणार विधानसभेसाठीचा उमेदवार, वाचा… 

टीम AM : राज्याच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. जागा वाटपाबाबतच्या चर्चा सुरू असताना आता भाजपने आपल्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजप बंद लिफाफ्याद्वारे आपला उमेदवार निवडणार आहे.

बंद लिफाफे ठरवणार भाजपचे उमेदवार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कोण असावेत यासाठी प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांना लिफाफा देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक जण तीन नावं पसंतीक्रमानुसार लिहून त्या लिफाफ्यात टाकतील. उमेदवार निश्चित करण्यात या लिफाफांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. उमेदवार ठरवण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयोग भाजपकडून केला जाणार आहे.

भाजपने महाराष्ट्रात यंदा विधानसभा उमेदवार निवडीसाठी नवीन फॉर्म्युल्याचा अवलंब केला आहे. आता भाजपचे प्रमुख पदाधिकारी उमेदवार ठरवणार आहेत. उद्यापासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय देण्यात येणार आहेत. तर, चार ऑक्टोबरपासून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत. उमेदवार निवडीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते गुप्त पद्धतीनं जाणून घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.

उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात राबवणार राजस्थानी पॅटर्न

उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता या लिफाफाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. यापूर्वी ही पद्धत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आमलात आणली गेली होती. त्याचा पक्षाला मोठा फायदा झाला होता. विविध सर्वे मधून आलेली नावे, संघ परिवारांनी सुचवलेली नावे आणि आता पदाधिकाऱ्यांकडून येणारी नावे याच्या आधारावर उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहेत.

उमेदवार निवडीसाठी मते ठरणार निर्णायक ?

जिल्हाध्यक्षांकडून विधानसभा संपर्कप्रमुखांकडे बंद लिफाफे दिले जाणार आहेत. मतदारसंघातील 80 ते 100 पक्ष पदाधिकारी यासाठी 3 पसंती उमेदवार क्रमवारीमध्ये टाकणार आहेत. प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित, विशेष निमंत्रित, प्रदेश मोर्चा पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी सगळ्यांची मतं बंद लिफाफ्यात असणार आहेत.

प्रत्येक मतदारसंघात प्रमुख पदाधिकाऱ्यांना लिफाफा देण्यात येणार आहे. 160 मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांना लिफाफा देणार आहेत. हे लिफाफे चार पदाधिकाऱ्यांसमोर सीलबद्ध करण्यात येणार आहेत. 2 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांची नावं घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून लिफाफे भाजपच्या कार्यालयात जमा केले जाणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.